Saturday, June 25, 2016

काही शब्द जीवाभावाचे वाटतात, कारण ...

आयुष्यात माणसांचे येणं-जाणं चालूच असतं.
भूतकाळ आठवला की कळतं, कित्येक हात आपणही सोडलेत.

एकेकाळी त्यांच्या शिवाय जगणं जमेल की नाही हा प्रश्न पडलेले आपण अजूनही जिवंत आहोत.
का? कारण शरीर निर्लज्ज असतं.

वेळ जाते, माणसं बदलतात, माणसांसोबत आपणही बदलतो. कुणी आलं म्हणून त्रास होतो, तर कुणी गेलं म्हणून त्रास होतो, कधी आलेलं गेलं म्हणून त्रास होतो तर कधी गेलेलं आलं म्हणून त्रास होतो. पण कुणी गेलं तरी आयुष्याच्या काही क्षणी त्या व्यक्तीची आठवण प्रकर्षाने येते. आठवण काढता येत नाही. ती येते विना परवानगी.

एकेकाळी 'आपण' असलेला शब्द 'तू' आणि 'मी' झाल्यावरही तितकाच जवळचा वाटू शकतो!
काही दिसलं काही ऐकलं की, आठवतं काही न काही....कोणी ना कोणी.

शब्द एकटे नसतात. शब्दांना माणसं चिकटलेली असतात, म्हणूनच काही शब्द जीवाभावाचे वाटतात.

☺❤☺❤☺❤☺❤☺❤☺❤☺

Written by : unknown creative 

No comments:

Post a Comment