Sunday, March 26, 2017

कसे मान्य करावे वय झाले - कविता

कसे मान्य करावे वय झाले      
आता कुठे जीवन सुरू झाले  
जरी जीवन साठीला आले    
                     *कसे मान्य करावे?*

बालपण खेळण्यात गुंतले  
कुमार वयाला अभ्यासाने घेरले 
तारूण्य करीअरसाठी घातले 
जग रहाटी म्हणून लग्न केले
मुलांचे भविष्य त्यात घडविले
वाटले, जीवन आता सुरू करावे
अन्, तुम्ही म्हणता वय झाले
                     *कसे मान्य करावे?*

वयात या आवडी निवडी जपावे
राहिले छंद ते पुरे करावे 
जग फिरायचे फिरून घ्यावे 
मित्रांसवे वय विसरावे
जगणे आता सुरू करावे
अन् तुम्ही म्हणता वय झाले?
                 *कसे मान्य करावे?*

राहीलेले जीवन जगून घ्यावे
सुखदुःखाना का आठवावे?
भेटतील साथी संगे घ्यावे
क्षणा-क्षणाला जगून घ्यावे
वयाचे बंधन कश्याला असावे?
अन् तुम्ही म्हणता वय झाले
                  *कसे मान्य करावे?*

Written by : unknown creative 

🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

उन्हाळ्यात काय खावं आणि काय खावू नये?

उन्हाळ्यात नेमकं काय खावं आणि काय खावू नये?
या महत्वाच्या टिप्स तुमच्या शरिरासाठी फायदेशीर

यंदा फेब्रुवारीच्या अखेरीच उन्हाच्या झळा लागायला सुरूवात झाली. होळी पेटायच्या अगोदरच उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे शरीराची काळजी कशी करावी हे समजून घेणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. 
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचे चांगले चटके बसतात. तसेच उकाड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो. त्यामुळे आपल्या शरिरासाठी नेमकं काय चांगल आणि काय वाईट हे समजून घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे.
उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणत्या वस्तू, पदार्थ, फळे खावीत याबाबत आर्युवेदात सांगितले आहे. उन्हाळ्यात शरिरात थंडावा निर्माण करेल असे पदार्थ खावेत. जेणे करून शरिरातील तापमान कमी राहण्यास मदत होते.

थंड पदार्थ – 
१. सफरचंद, २. चिकू, ३. कांदा, ४. पालक, ५. कोबी, ६. गाजर, ७. बीट, ८. बडीशेप, ९. वेलची, १०.डाळींब, ११.मूग डाळ आणि दूध, दही, तूप, ताक, तांदूळ.

उष्ण पदार्थ – 
१. संत्री, २. लिंबू, ३. बटाटा, ४. टॉमेटो, ६. कारले, ७. मिरची, ८. मका, ९. मेथी, १०. वांगे, ११. भेंडी, १२. पपई, १३. अननस, १४. ऊस, १५. मीठ
१६. चणाडाळ, १७. गुळ, १८. तिळ, १९. शेंगदाणे, २०. बदाम, २१. काजू, २२. अक्रोड, २३. खजूर, २४. हळद, २५. कॉफी

उन्हात नेमकं काय खावे?  
फळे: ‘Nature is the best doctor and precribes lot of medicine through his natural pharmacy.’ 
निसर्ग आपल्याला योग्य तो सगळा आहार पुरवतो. उन्हाळ्यात द्राक्षे, खरबूज, टरबूज, आंबा ही फळे येतात. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या रसदार फळांचे सेवन गरजेचे ठरते.

भाज्या: 
भाज्यांमध्ये पांढरे कांदे, पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, भाज्यांचा ज्यूस, आवळा, कोबी, मशरूम, भेंडी, पडवळ, बीट, रताळी, गाजर, तांदुळजा, सुरण इत्यादी प्रकार असावेत. जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे रायते, फळांचे शेक्‍स, सूप्स, नाचणीचे आंबिल, दही-भात असे प्रकार घ्यावेत.

मसाले : 
मसाले निवडताना शक्‍यतो धने आणि जिरे वापरावे. इतर उष्ण प्रकारचे मसाले वापरू नयेत. हर्बल टी किंवा ग्रीन टी शरीरासाठी चांगला असतो.

दही-ताक : 
ताजे दही किंवा ताक उन्हाळ्यात अवश्‍य घ्यावे. पचन चांगले होते, शरीराला थंडावा मिळतो. पुदिना, ताक मसाला घालून चविष्ट असे पाचक बनविता येते. उन्हात जाण्यापूर्वी ताक पिऊन बाहेर पडावे. घरच्या दह्याचा चक्का करून त्याचे पौष्टिक मयोनिज करावे आणि ते भाज्या व फळांसोबत खावे.

त्याशिवाय चमचाभर तुळशीचे बी किंवा सब्जा पाण्यात भिजत घालून थंड दुधातून घ्यावे. मुलांना देताना थोडा गुलकंद, वेलची किंवा इसेन्स घालून द्यावे.

उन्हाळ्यात काय करावे?
१)  घरी बनविलेले ताज्या फळांचे ज्यूस, आइस्क्रीम्स, कुल्फी खावी. ताजा उसाचा रस मात्र बर्फ न घालता घ्यावा.
२)  हलके, पौष्टिक, कमी स्निग्धांश असलेले अन्न खावे. दिवसातून चार वेळा थोडे थोडे अन्न खावे.
३) मिठाचा वापर योग्य प्रमाणात करावा.
४)  सकाळचा नाश्‍ता नियमित घ्यावा व रात्री लवकर जेवावे.
५)  जेवण टाळू नये. शक्‍यतो उपास टाळावा.
६)  जेवणाआधी पाणी पिऊ नये.

उन्हाळ्यात काय टाळावे?
१)  कॅफीनेटेड, कार्बोनेटेड, अल्कोहोलिक पेय कमी प्यावे. या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम रंग व भरपूर साखर असते. त्यामुळे भूक मरते. काही वेळा डायल्युटेड फॉस्फरिक ऍसिडही आढळते, ज्याचा पचन संस्थेवर दुष्पपरिणाम होतो; तसेच किडनी स्टोन, दातांवर प्लाक तयार होणे असे आजार जडू शकतात. दातांच्या घनतेवरही परिणाम होऊ शकतो.
२)  बाहेर मिळणारे गाडीवरचे गोळे, कुल्फी, पेप्सीकोला खाऊ नये.
३)  गार पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाऊ नयेत.
४)  समोसा, कचोरी, फरसाण, बुंदी, चिप्स, भजी असे तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
५) थंड ज्यूसेस किंवा सरबते घेतल्यावर आल्हाददायक वाटते खरे; पण ते सरबत बनविण्याची पद्धत, त्याची पौष्टिकता यांनाही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे सरबत घेण्यापूर्वी या काही गोष्टींचा विचार करा. शक्‍यतो घरच्या घरीच सरबते तयार करून ठेवा. ज्यूस काढल्यानंतर तो तसाच ठेवला, तर काढण्याच्या व ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये अ जीवनसत्त्वाचा ऱ्हास होतो; तसेच जीवनसत्त्व के टी हेसुद्धा कमी होते. त्यामुळे
६) फळे, भाज्या स्वच्छ धुवून खाव्या. ज्यूसर किंवा मिक्‍सरसुद्धा धुवावा.
७) ज्यूस हवेच्या कमीतकमी संपर्कात ठेवावे. तयार ज्यूस लगेचच प्यावे.  ज्यूस घोट घोट घेतला, म्हणजे त्यात लाळ मिसळून रसातील साखर पचण्यास मदत होते.

Written by : unknown 

🌞⛅🌞⛅🌞⛅🌞⛅🌞⛅🌞

Wednesday, August 10, 2016

आत्मपरीक्षण - लेख

एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
तरुण (अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?

तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो.

(डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला)

तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.

महिला : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.

तरुण : बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !!

महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?

तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!

महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
यावर हसत हसत फोन ठेवून निघाला.

दुकानदाराने त्याला थांबवले आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही न ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस"

यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय."

दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?

तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो" असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.

**********

# तात्पर्य : अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्ही नोकर असा की मालक, ते महत्वाचे नाही, तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का हे महत्वाचे आहे आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो तर आपण स्वतः !!

जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो.

Written by : unknown creative

🌟🌷🌟🌷🌟🌷🌟🌷🌟🌷🌟

Thursday, August 4, 2016

मुलांच्या मनातले आईचे स्थान - लेख

मुलांच्या मनातले आईचे स्थान
- डाॅ. रोशन रानडे

आमच्या मातृत्वाच्या अनुभवा वरून मी आणि अस्मिताने असा एक आराखडा बांधलाय कि, मुलांच्या मनातले आईचे स्थान हे इंग्रजी U अक्षरा सारखे असते.

म्हणजे असं कि लेकरे अगदी चिल्लर असतात तेव्हा आई म्हणजे सर्वस्व असते. 'my mommy bestest' असते तेव्हा. तहान- भूक, झोप, शी-शू, दुखणं-खुपण असल्या सर्व महत्वाच्या प्रश्नावर तिच्याकडे रामबाण उपाय असतात, त्यामुळेच ती अगदी सर्वोत्तम असते.

शाळा सुरू झाली कि मुलांच्या भावविश्वात 'टीचर' नावाच्या एका व्यक्तिचा शिरकाव होतो. आणि आई कितीही उच्चविद्याविभूषित असूदे, ती टीचरपेक्षा हुशार नसते. इथे आईच्या स्थानाला धक्का बसायला सुरवात होते.

प्राथमिक शाळेत तरी परिस्थिती बरी असते, पण माध्यमिक शाळेत तर घसरगुंडीच चालू होते.

लेकरे किशोरवयीन झाली, म्हणजे आजच्या भाषेत terrible teens मधे गेली, की आईचे स्थान U च्या सगळ्यात खालच्या बाजूला पोहोचलेले असते. कारण?
'एकतर ती खूपच uncool असते. तिला modern gadgets काही वापरता येत नाहीत. स्वतःच्या स्मार्ट फोन वरचे सगळे फीचर्स सुद्धा वापरत नसते. तिचा fashion सेन्स OMG !!!!! तो nonexistent असतो.
केस विंचरले का? ब्रश केला का? कुठे चालले? कधी येणारे परत? असले बावळट प्रश्न मित्र मैत्रिणींसमोर विचारते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे सर्वांसमोर बच्चू, पिल्लू अश्या नावाने हाक मारते.
मी काय बेबी आहे का?'

ह्या नंतर पुढच्या शिक्षणासाठी घराबाहेर पाऊल पडते आणि आईचा भाव वधारायला सुरवात होते. होस्टेलच्या मेसमधले जेवायला लागल्यावर आईच्या हाताच्या चवीची फार प्रकर्षाने सय येते. ह्याही पुढे जाऊन स्वतःचे कपडे स्वतः धुणे, चहा कॉफी, maggi, अंडे असे साधेसेच का होईना खाद्य पदार्थ
बनवणे आणि मुख्य म्हणजे त्यानंतर भांडी घासून जागेवर ठेवणे इत्यादि इत्यादी… आता आईचे महत्व चांगलेच पटायला लागते.

ह्याहून पुढे जाऊन नोकरी चाकरी सुरू झाली कि, आपली आई आयुष्यभर बाहेरची आणि घरातली अश्या दोन डगरीवर पाय ठेऊन लीलया चालत आली आहे ह्याचे कौतुक वाटायला लागते.

आता आम्ही पुढच्या अंकाची वाट बघतो आहोत. जेव्हा आमची ही सुजाण बालके अजाण पालक बनतील आणि त्यांना बहुधा पुन्हा जाणवेल, 'my mummy bestest !' आमच्या सिद्धांताचा हा शेवटचा पडताळा!!!

- डॉ रोशन रानडे

💐🍥💐🍥💐🍥💐🍥💐

सुखांचे सॅशे - लेख

सुखांचे सॅशे!
लेखक - प्रसाद शिरगांवकर

आपण किराणामालाच्या दुकानात उभे असतो, मुलानी कुठलीशी दुधात घालायची पावडर आणि बायकोनी कुठलासा लै भारीवाला शांपू आणायला सांगितलेला असतो…  या दोन्हीच्या च्या रेग्युलर पॅक्स वरच्या किंमती बघून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते… आपण ते घ्यावेत का नाही या द्विधा मनःस्थितीत असताना दुकानदार हळूच सांगतो, ‘दोन्हीचे सॅचे आहेत साहेब… try करून बघा…’ मग आपण ते ‘सॅचे’ किंवा सॅशे बघतो… अगदीच पाच-दहा रुपयांना असतात… खुष होऊन आपण दोन्हीचे दोन-चार सॅशे घेऊन टाकतो आणि ताठ मानेनं घरी परत जातो!!

'सॅशे' हे भारतीय बाजारपेठेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केलेलं सगळ्यांत मोठं इनोव्हेशन आहे! हल्ली शांपू पासून सॉसेस पर्यंत, साबणांपासून मसाल्यांपर्यंत, गोळ्या-बिस्किटांपासून ते नारळपाण्याच्या पावडरी पर्यंत कशाकशाचेही सॅशे मिळतात… गिऱ्हाईकाला एकदम एक मोठ्ठा पॅक शे-दोनशे-चारशे रुपयांना घ्यायला लावायच्या ऐवजी दोन-पाच-दहा रुपयांचे ‘छोटे पॅक्स’ देणं हे त्या गिऱ्हाईकाच्या आणि आपल्याही फायद्याचं आहे हे आजकाल सगळ्याच कंपन्या जाणतात आणि तसं वागतातही…! आपणही खूप पैसे देऊन मोठ्ठे पुडे विकत घ्यायच्या ऐवजी कमी पैसे देऊन छोटे पॅक्स आणि सॅशेज विकत घेतो…

पण किराणामालाच्या दुकानातल्या व्यवहारांत दाखवत असलेला हा समजुतदारपणा आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र अमलात आणत नाही!!

आपण आपल्या आयुष्यात सुखांच्या मोठ्या मोठ्या पॅकेट्सच्या मागे अहोरात्र धावत असतो…. मोठ्ठं घर… मोठ्ठी गाडी… भरपूर बॅंक बॅलन्स… अफाट प्रसिद्धी… प्रचंड यश… वगैरे वगैरे वगैरे…. सुखांचे हे भले मोठ्ठे पॅक्स मिळावेत म्हणून आपण जीवापाड मेहनत करत रहातो… हे मोठे पॅक मिळाले / मिळवले तरच आनंदी होतो… नाही मिळाले तर किंवा मिळत नाहीत तोवर दु:खी रहातो…

पण सुखं ही फक्त मोठ्या पॅक्समध्ये मिळत नाहीत तर छोट्याश्या सॅशे मध्येही मिळू शकतात हे आपण लक्षातच घेत नाही!!

म्हणजे,
"मोठ्ठं घर” होईल तेंव्हा होईल, पण सध्याच्या छोट्या घरात निवांत जगत सुखानं शांत झोप लागू शकणं हा किती छान सुखाचा सॅशे असतो...

"मोठ्ठी गाडी” घेऊ तेंव्हा घेऊ, पण सध्याच्या छोट्या गाडीतून वाऱ्यावर स्वार होऊन गावभर बेभान भटकणं हाही एक सुखाचा सॅशे असतो…

हेच सारं प्रसिद्धी, यश वगैरे साऱ्या साऱ्या मोठ्या पॅकेजेसचं… या सगळ्या मोठय़ा पॅकेजेसचे कोणते ना कोणते छोटे सॅशे असतात… जे आपण ओळखून अनुभवले ते मोठ्या पॅक्सहून जास्त सुखाचा अनुभव आपल्याला येऊ शकतो…

रहाता रहाते गोष्ट ती "भरपूर बॅंक बॅलन्स” किंवा खिशातल्या अफाट पैशाची… पैसा हे एक असं पॅकेज आहे की ज्याच्या सॅशेमध्ये मजा नाही असं आपल्याला वाटतं… हजारच्या नोटेची किंमत शंभरच्या नोटेला नाही आणि शंभरच्या नोटेची ऊब पाच रुपयाच्या नाण्याला नाही…

खरंच असं वाटतं तुम्हाला?

तर मग, धो धो पाऊस कोसळत असताना, टपरीवरचा वाफाळता चहा आणि गरम्म भजी हवी घेण्यासाठी हजारची नोट देऊन बघा किंवा लाखो रुपये बॅलन्स असलेलं तुमचं क्रेडिट कार्ड देऊन बघा…!!

नाही मिळणार ते सुख तुम्हाला हजारो लाखो रुपयांनी…

तिथे पाच रुपयांच्या कॉईन्सचे दोन-चार सॅशेच पुरेसे असतील!!

लेखक - प्रसाद शिरगांवकर

😊🌟😊🌟😊🌟😊🌟😊